कथा पंढरपूरच्या विठ्ठलाची

admin

Updated on:

        विठोबा म्हणजेच विठ्ठल. हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रात विठोबाच्या दर्शनासाठी वारकरी लोक पंढरपुरात जातात. विठ्ठल म्हणजेच पांडुरंग, दुसरं तिसरं कोण नसून भगवान विष्णूचे अवतार आहेत. कटे वरती हात ठेवून हा पांडुरंग उभा असतो. कधी त्याची पत्नी रखुमाई म्हणजेच रुक्मिणी सोबत असते. 

याच विठ्ठलाची, पंढरपूरच्या विठ्ठलाची कथा आपण पाहूया.

कथा पंढरपूरच्या विठ्ठलाची :

         पंढरपूरचा विठ्ठल होण्यामागे भक्त पुंडलिक याचा खूप मोठा वाटा आहे. पुंडलिक आपल्या आई वडील आणि पत्नी बरोबर दिंडीर वनात राहत होता. आई-वडिलांशी तो व्यवस्थितपणे वागायचं नाही. एकदा आई-वडिलांनी काशीला जायचे ठरवले. हे त्याच्या पत्नीने ऐकले व तिने देखील काशीला जायचे ठरवले. म्हणून मग सगळेच काशी यात्रेला जायला निघाले. काही अंतर चालल्यावर ते कुक्कुटस्वामीच्या आश्रमामध्ये थांबले व काही दिवस तिथेच राहण्याचे त्यांनी योजिले. बऱ्याच पहाटे काही खराब कपड्यांमधील स्त्रिया आश्रमात यायच्या. आश्रम साफ करायच्या. स्वामींचे कपडे धुवायच्या आणि मग लुप्त व्हायच्या. एके दिवशी न राहून पुंडलिकाने त्यांना विचारले की आपण कोण? त्यांनी सांगितले की तू खूप पापी आहेस. आम्ही पवित्र नद्या गंगा आणि यमुना. लोक आमच्या नद्यांमध्ये स्नान करून सर्व पाप नष्ट करतात. त्यामुळे आमचे हे कपडे खराब होतात आणि आम्ही इथे स्वामींच्या आश्रमात येऊन पवित्र होतो. तू तुझ्या आई वडिलांची व्यवस्थित देखरेख करत नाही. त्यामुळे तू पापी आहेस. त्यांचे बोलणे पुंडलिकाला खूप लागते आणि त्यामध्ये बदल घडून येतो तो असा की त्याच्या आई-वडिलांना तो यात्रेस जाऊ नका म्हणून सांगतो व पुन्हा दिंडीर वनामध्येच आपण जाऊया यासाठी त्यांना तयार करतो. 

       एकीकडे भगवान विष्णू हे गोपिका आणि राधेच्या आठवणींमध्ये रमतात आणि राधा जी आता जिवंत नाही तिला आपल्या दिव्यशक्तीने पुन्हा निर्माण करतात आणि बाजूला बसवतात. तेवढ्यात रुक्मिणी आत येते आणि रुक्मिणीला पाहून राधा उभी राहत नाही याचा रुक्मिणीला फार राग येतो आणि त्यामुळे रुक्मिणी घर सोडून निघून जाते. तिचा हा अज्ञातवास भगवान विष्णूंना सहन होत नाही. ते देखील तिला शोधायला बाहेर पडतात. द्वारकेस, गोकुळेस सगळीकडे रुक्मिणीचा ते शोध घेतात. पण ती कुठेच सापडत नाही. शेवटी ते दिंडीर वनामध्ये येतात. तेथे त्यांना रुक्मिणी सापडते. ते तिची समजूत घालतात. तिचा राग शांत करतात आणि मग तिथेच पुंडलिक देखील आश्रमामध्ये असतो. त्याची आई वडील यांवरील निस्सीम प्रेम आणि श्रद्धा पाहून भगवान विष्णू रुक्मिणीसह त्याला भेटावयास जातात. पण तो आपल्या आई-वडिलांच्या सेवेमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे तो भगवंताला भेटण्यास नकार देतो आणि त्यांच्यापुढे एक वीट फेकतो आणि सांगतो यावरती उभे रहा आणि वाट पहा. त्याची सेवा करून झाल्यानंतर मग तो भगवंताकडे येऊन त्यांची क्षमा मागतो व त्यांना तिथेच म्हणजे पंढरपुरात स्थायिक होण्यासाठी सांगतो. जेणेकरून भक्तांचा उद्धार होईल आणि भगवंत देखील त्याला ते वरदान देतात आणि ते पांडुरंगाच्या अवतारामध्ये पंढरपुरामध्ये विराजमान होतात. तर अशी ही पंढरीच्या विठ्ठलाची कथा.

        पंढरपूर हे आपल्या महाराष्ट्र मधील प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे. येथे भगवान विठ्ठल विराजित असून वारकरी न चुकता वारी करत आपल्या लाडक्या विठोबाच्या दर्शनासाठी येथेच येतो. येथील चंद्रभागा नदीमध्ये तो स्नान करतो आणि मगच विठ्ठलाचे दर्शन घेतो. तर पांडुरंग हा भगवान विष्णूचा अवतार. येथे वर्षातून चार यात्रा असतात. त्या मधील आषाढी एकादशीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. पंढरपुरामध्ये असलेल्या भीमा नदीला चंद्रभागा देखील म्हणतात. तर अशा या पंढरीच्या सावळ्या विठुरायाची बुधवारी पूजा केली जाते. जर बुधवारी वारकरी पंढरपुरीत असतील तर ते तिथून निघत नाहीत. तर असा हा भक्तांचा कैवारी विठोबा, पांडुरंग, विठ्ठल आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असतो. त्यांचे जीवन धन्य करत असतो. 

Leave a Comment