आषाढी एकादशी महत्त्व व संपूर्ण माहिती

admin

Updated on:

         वारीला जाण्याची परंपरा ही खूप जुनी आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय या वारीत सामील होतो आणि विठू नामाचा गजर करत पंढरपूर पर्यंत पायी प्रवास करतो. खरे पाहता आषाढ महिना आणि कार्तिक महिना या दोन्ही महिन्यात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी ही वारी होते. पण खरे तर आषाढी एकादशीची वारी ही खूपच महत्त्वाची मानली गेली आहे. या दिवशी संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आळंदी मधून व संत तुकाराम यांच्या पादुका देहू वरून पालखीतून निघतात आणि पंढरपूर मध्ये पोहोचतात. या लेखात पाहू आषाढी वारीचे महत्व.

आषाढी एकादशी महत्त्व व संपूर्ण माहिती

वारी आणि शेतकरी यांचा संबंध:

      आषाढी वारीला सुगी देखील म्हणतात. म्हणजेच वारीस जाण्याआधी शेतकरी शेतात पेरणी करतो . वारीवरून आल्यानंतर त्याच्या शेतात तोपर्यंत वाढ झालेली असते. ते पाहून शेतकऱ्याला अजून स्फूर्ती मिळते पुढील कामे करण्यासाठी.

आता पाहू आषाढी वारी म्हणजे काय?

       वारकरी पायी पंढरपूर येथे पोहोचतात. तसेच हे वारकरी आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचतात. या आषाढी वारीची प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धेचे स्थान आहे. आषाढी वारीत अनेक संतांच्या पालख्या असतात. तसेच वारकरी स्वतःच्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी म्हणून अनेक दिवस पायी प्रवास करतात. यामध्ये महिला देखील डोक्यावरती तुळशीचे वृंदावन घेऊन चालत असतात.

वारीमध्ये असंख्य दिंड्या आपल्याला पाहायला मिळतात. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून ही वारी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होते आणि वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतो. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटतो . थोडा वेळ का नाही…. आपल्या रोजच्या आयुष्यातील सगळी दुःख बाजूला सारून पांडुरंगाशी एकरूप होतो. संपूर्ण वारीमध्ये हरिनामाचा जयघोष, विठ्ठलाचा गजर सुरूच असतो. त्यात एवढे दिवस पायी चालून जो काही थकवा वाटत असतो तो सगळा दूर होतो. आपल्या लाडक्या देवाच्या नामस्मरणात दिवस कसा पूर्ण होतो हे देखील कळत नाही.

वारी आषाढी एकादशीलाच का असते

     वारी खास करून आषाढी एकादशीलाच किंवा एकादशीलाच का असते? यासाठी शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. जसे की एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. कारण आपले एक वर्ष हे आपल्या देवांची एक अहोरात्र असते असे म्हणतात. दक्षिणायन म्हणजे रात्र आणि उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस. त्यामुळे आषाढ महिन्यात येणारी कर्क संक्रांत उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते. देवांच्या निद्रेची एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी.

म्हणूनच देवाची रात्र सुरू होते असे म्हणतात. देवांच्या या निद्रेच्या काळामध्ये असूर खूप शक्तिशाली होतात आणि मनुष्यांना त्रास देतात. या आसुरांपासून रक्षण करण्यासाठी आपण काहीतरी उपासना करायला हवी त्यामुळे या दिवशी रोजच्या पूजेबरोबर श्रीविष्णूची देखील पूजा केली जाते.  तुपाचा दिवा लावतात. त्यात विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्याची देखील पूजा करतात आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारी करण्यास खास महत्व दिले गेले आहे.

आषाढी एकादशी दंत कथा:

        मृदू मान्य नावाचा एक असुर होता. त्याने भगवान शंकराकडून एक वरदान प्राप्त केले, ते म्हणजे अमरत्वाचे, म्हणजेच तो कधीच मरणार नाही असे हे वरदान होते. पण भगवान शंकर यांनी एक मात्र सांगितले की, तू एका स्त्रीच्या हातून मात्र नक्की मरशील. अशा या अजिंक्य असुराला नेमके हरवायचे तरी कसे? असा प्रश्न सर्व देवांसमोर पडलेला आणि त्यांनी भगवान शंकरांची मदत मागितली. पण भगवान शंकरांनी  नाकारली. घाबरून सर्वदेव चित्रकूट पर्वतावरती आवळी वृक्षाच्या खाली असलेल्या एका गुहेमध्ये लपून राहिले.

त्यावेळी नेमकी आषाढी एकादशी होती आणि पाऊसही पडत होता. या पावसात सर्व देवांचे स्नान झाले आणि सकाळपासून त्यांनी काहीही खाल्ले नव्हते त्यामुळे आषाढी एकादशीचा उपवास देखील त्यांचा घडला. असे असताना सर्व देव एकत्र होते आणि त्यांच्या त्या एकत्रित श्वासामधून एक शक्ती निर्माण झाली आणि या शक्तीने त्या मृदू मान्य असुराला ठार केले सर्व देवांची सुटका केली. या शक्तीला एकादशी देवता असे म्हणतात. 

          त्यामुळे एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचे आशीर्वाद असतात आणि म्हणूनच एकादशी च्या दिवशी आपल्याकडे उपवास केला जातो. अगदी पंढरीच्या वारीला जाणारा वारकरी देखील उपवास ठेवतो आणि जो वारीला जाऊ शकत नाही तो देखील स्वतःच्या घरामध्ये राहून उपवास ठेवतो. अशाच असंख्य अशा दंतकथा विठ्ठलाच्या बाबतीत देखील आहेत. आपला लाडका विठुराया म्हणजेच श्रीहरीचा अवतार आहे. तर अशी ही वारी ज्याने वारकरी संप्रदायाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

Leave a Comment