पंढरीची वारी संपूर्ण माहिती | Pandharpur Wari Information in Marathi

admin

Updated on:

      वारकरी संप्रदायासाठी वारी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाच्या वारीच्या परंपरेची सवयच आहे. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी जनसामान्य पदयात्रा काढतात त्यालाच वारी असे म्हणतात आणि ही पदयात्रा करणाऱ्याला वारकरी असे म्हणतात. वर्षानुवर्ष वारकरी संप्रदाय वारीची ही परंपरा जपत आला आहे. 

Pandharpur Wari Information in Marathi | पंढरीची वारी संपूर्ण माहिती

     एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत या वारीच्या परंपरेची जपणूक चालत आहे. प्रत्येक कुटुंबातील एक तरी सदस्य वारीला जाऊन आलेला असतो आणि तशी मग ती एक प्रथाच पडते की एकदा तरी वारीला जाऊनच यावे आणि विठुरायाची गळा भेट घ्यावी. या लेखात पाहूया पंढरीच्या वारीची माहिती:

       वारीत चालणारे हे वारकरी कशाचीही तमा न बाळगता पंढरपूर पर्यंत पायी प्रवास करतात. अनेक दिवस, अनेक आठवडे हा त्यांचा प्रवास चालू असतो आणि मग स्वतःच्या लाडक्या विठुरायाला भेटून सगळा शीण आणि त्रास निघून जातो व वारकरी विठुरायाशी एकरूप होतो.

शुद्धता आणि सात्विकता

     काय किमया आहे ना वारीची? या वारीमध्ये सर्वसामान्य मनुष्य एकाच स्तरावरती येतो. सर्व भेद विसरून सगळेजण ह्या सोहळ्यात भाग घेतात.

       वारीत सामील झालेले, शुभ्र वस्त्र धारी वारकरी, असे वाटते की त्यांनी शुद्धता आणि सात्विकता परिधान केली आहे. शुभ्र पांढरा सदरा, डोक्यावर टोपी, धोतर, कपाळावरती टिळा आणि गळ्यात तुळशीच्या माळा. हा असतो वारकऱ्यांचा पेहराव. तसेच या वारीमध्ये स्त्रिया देखील मागे नाहीत. कारण डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला देखील वारीमध्ये सहभागी होतात.

पालखी सोहळा:

       वारीमध्ये आपल्याला दोन पालख्यांचा सोहळा पाहायला मिळतो. एक संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि दुसरी संत तुकाराम महाराजांची. पालखीचे विशेष आकर्षण असते ते म्हणजे रिंगण आणि धा. असंख्य भक्तगण विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर असतात आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ही वारी पूर्ण होते, पूर्ण करतात. या वारीमध्ये असंख्य दिंड्या देखील सामील असतात. वारकऱ्यांची भोजन व्यवस्था व इतर व्यवस्था पाहणे हे त्या दिंड्यातील लोकांचे काम.

तसेच हे काही दिवस आपले घरदार सोडून वारकरी वारी मध्ये आलेले असतात. या दिवसांमध्ये फक्त आणि फक्त देवाचे नामस्मरण, भजन, किर्तन आणि तसेच हरीचे नाम, विठुरायाचे नाम घेत असतात. उठता बसता फक्त विठ्ठलाचे नामस्मरण हे वारकरी करत असतात. समतेचा संदेश देणारी ही वारी अनेक वारकऱ्यांना आपल्यामध्ये सामील करते. सर्व भेदभाव विसरून, सर्व अहंकार बाजूला सारून, सर्व जाती धर्म विसरून, या वारीमध्ये असंख्य भक्तगण येतात आणि रमून जातात. काही काळासाठी स्वतःची दुःख, त्रास, विवेचना सर्व काही बाजूला ठेवून सर्व फक्त विठुरायाच्या भक्तीत लीन होतात. त्यागाचे आणि भक्तीचे स्वरूप या वारकरी लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 

चंद्रभागा

       ही वारी पंढरपूर मध्ये समाप्त होते. पंढरपूर हे महाराष्ट्र मधील एक तीर्थक्षेत्र आहे. भीमा नदीच्या काठी असलेले विठ्ठल मंदिर म्हणजेच पंढरपूर. यालाच दक्षिण काशी देखील असे म्हणतात. भीमा नदीला चंद्रभागा असे म्हणतात, कारण भीमा नदी, शहराजवळ चंद्रभागासारखा आकार घेते.

        आपल्या लाडक्या देवाची उपासना आणि त्याच्या नामाचा गजर या वारीमध्ये सतत आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतो. वारकरी या वारीमध्ये तल्लीन होऊन नाचतात. हरिनामाचा गजर करतात. रोज वीस किलोमीटर पायी प्रवास करून देखील हे वारकरी तेवढेच उत्साही असतात. या वारीमध्ये अगदी साठ वर्षाच्या वरील वृद्ध व्यक्ती देखील तरुणांप्रमाणेच जोशामध्ये असतात. प्रत्येक वारकऱ्यांच्या अंगी उत्साह संचारतो.

         तर अशी ही वारी आणि त्यातील वारकरी व वारीचा तो अभूतपूर्व सोहळा. लाडक्या विठुरायाला भेटण्याची आतुरता, ओढ, समतेची शिकवण देणारी अशी ही पंढरीची वारी. अश्या या वारीला दरवर्षी अफाट प्रतिसाद मिळतो आणि प्रत्येक वर्षी हा वाढतच जातो. कधी ही न संपणारी अशी सुंदर परंपरा, ज्यात विठलाची उपासना केली जाते. त्यात साथ मिळते ती असंख्य अश्या वारकऱ्यांची. आयुष्यात एकदा तरी या वारीला जाऊन यावे. त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा आणि आपले जीवन धन्य करावे.

Leave a Comment